विधानसभा निवडणुकीत दहा टक्के उमेदवार हे अल्पसंख्यांक समाजाचे असतील - अजित पवार
![विधानसभा निवडणुकीत दहा टक्के उमेदवार हे अल्पसंख्यांक समाजाचे असतील - अजित पवार](https://news15marathi.com/uploads/images/202410/image_750x_6707fc26bdeab.jpg)
प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचं भूमिपूजन, लोकार्पण सोहळा आज दि.१०.अक्टोबर गुरुवार रोजी दुपारी पार पडला. या आयोजित शेतकरी मेळाव्यात उपस्थितांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबोधित केले.आमदार बाबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून आपण आपल्या मतदारसंघाचा विकास करून घेऊयात. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पाठीशी भक्कम उभं रहा, असं आवाहन यावेळी केलं.
तसेच पुढे म्हणाले की, आम्ही राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये मेडिकल कॉलेज उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दहा जिल्ह्यांमध्ये सरकारी मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम काल पंतप्रधानांच्या हस्ते झाला. माझ्या शेतकरी बांधवांच्या हितासाठी, त्यांच्या फायद्यासाठी हे सरकार सदैव प्रयत्नशील आहे. लाखांचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाला वीज बिल माफी दिली. एक रुपयात पीक विमा दिला. दुधावर प्रतिलिटर ५ ऐवजी ७ रुपयांचा अनुदान देऊ केला. कांद्यावरील निर्यात बंदी हटवली. माझा शेतकरी सुखी तर संपूर्ण देश सुखी राहील. वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत आम्ही देऊ केले आहेत. माझी लाडकी बहीण योजना आम्ही आणली, ती अतिशय लोकप्रिय ठरली.महायुतीचं सरकार या न त्या मार्गानं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास ७५ हजार रुपयांचं अनुदान देऊ करत आहे. त्याचा शेतकरी कुटुंबांना नक्कीच फायदा होईल. राज्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपलं सरकार उपाययोजना आखत आहे. पाणी साठवण आणि सिंचन क्षेत्रात वाढ करण्याबाबतचं धोरण शासनानं आखलेलं आहे. आम्ही प्रत्येक समाजासाठी काम करत आहोत, लढत आहोत. मला जाती-जातीमध्ये सलोखा ठेवायचा आहे. मी अप्पलपोटा नाही, मला महाराष्ट्राला मोठं करायचं आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाच्या अंतर्गत लढणाऱ्या उमेदवारांपैकी दहा टक्के उमेदवार हे अल्पसंख्यांक समाजाचे असतील यावेळी अजित पवार म्हणाले.