मुख्यमंत्र्यांनी साधला उपोषणकर्त्यांशी संवाद.! खासदार हेमंत पाटील यांचा पुढाकार...

मुख्यमंत्र्यांनी साधला उपोषणकर्त्यांशी संवाद.! खासदार हेमंत पाटील यांचा पुढाकार...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - किरण मुक्कावार, यवतमाळ

मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी; उमरखेड येथील तहसील कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांशी.! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या भ्रमणध्वनीवरून थेट संवाद साधला आहे. तसेच पुढील दोन - चार दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे अभिवचन दिले आहे. परंतु यावर उपोषणकर्तें समाधानी न होता जोपर्यंत शासनाचा निर्णय निघणार नाही; तोपर्यंत आमरण उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला .

येथील तहसील प्रांगणामध्ये मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळाले पाहिजे व मराठा समाजाचा कुणबी मध्ये समावेश करण्यासाठी मराठवाड्या पुरता जो शासन निर्णय निघाला आहे. त्यामध्ये 1960 पूर्वी मराठवाड्यात असलेल्या उमरखेड, पुसद व महागाव या तालुक्याचा समावेश करण्यात यावा या व इतर मागण्यासाठी सचिन घाडगे, गोपाल कलाने, शिवाजी पवार, सुदर्शन जाधव, शरद मगर हे पाच युवक आमरण उपोषणाला बसले असून, आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे.

काल सहाव्या दिवशी रात्री खासदार हेमंत पाटील, आमदार नामदेव ससाने व संदीप धुर्वे यांनी उपोषण मंडपात भेट दिली. यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावून उपोषणा संदर्भातली स्थिती अवगत केली. यावर मुख्यमंत्र्यांनी उपोषणकर्त्यासमोर सदर आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकले पाहिजे यासाठी सरकार प्रयत्न करत असून, एक सप्टेंबर रोजी निघालेल्या शासन निर्णयामध्ये उमरखेड, महागाव व पुसद तालुक्याचा समावेश करण्यात येईल व त्यासाठी तात्काळ बैठक लावण्याचे अभिवचन दिले. त्यानंतर खासदार व आमदार यांनी उपोषणकर्तांना उपोषण मागे घेण्यास सांगितले. परंतु, जोपर्यंत निर्णय लागणार नाही तोपर्यंत उपोषण उठणार नाही; असे निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर उपोषण मंडपातून खासदार हेमंत पाटील व आमदार नामदेव ससाने निघून गेल्यानंतर लागलीच पाच मिनिटात परत हेमंत पाटील उपोषण मंडपात आले व त्या ठिकाणी समाज कल्याणचे अव्वर सचिव सुमीत भांगे यांचा सुद्धा उपोषणकर्त्यांसोबत संवाद घडवून आणला. त्यांनी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सूचना दिल्याचे सांगून या संबंधाने बैठक लावणार असल्याचे सांगितले त्यामुळे खासदार हेमंत पाटील यांनी आमदार नामदेव ससाने यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे सांगत उपोषण मंडपातूनच सरळ मुंबईकडे प्रस्थान केले. त्यामुळे मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकीकडे उपोषणकर्त्यांचे लक्ष लागले.