स्थानिक पाणी पुरवठादार खेळतोय सारा वसाहतीच्या सी-फेजच्या नागरिकाच्या जीवाशी, बिल्डर मात्र बघ्याच्या भूमिकेत..?
News15 मराठी प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : खराबवाडी गावातील सारा वसाहत कोणत्या न कोणत्या कारणामुळे सदैव चर्चेत असते. आता सारा वसाहतीची सी-फेज चर्चेत आली आहे. सारा सी -फेज बिल्डरने काही कामे अपूर्ण असतांना सदनिका धारकांना आग्रह करून तुम्ही सोसायटी स्थापन करून घ्या असा आग्रह धरला होता. त्यानुसार भोळ्या भाबड्या सदनिका धारक मालकांनी बिल्डरच्या बोलण्यावर विश्वास ठेवून थेट सारा सी-फेजच्या चार सोसयत्या स्थापन करून दिल्या. पण त्यानंतर काही वेगळेच विषय या स्थापन झालेल्या सोसायट्यामध्ये निर्माण झाले आहेत.
त्यातील महत्वाचा विषय म्हणजे बिल्डरने सदनिका विकताना ग्राहकांना मी काय सुविधा पुरविणार आहे याचा रीतसर बिल्डर आणि ग्राहक यांच्यात करार करण्यात आला होता. पण बिल्डरने यातील बर्याच गोष्टी अजूनही सदनिका मालकांना दिल्या नसल्याचे समोर आले आहे. त्यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे पाणी पण, आता सदनिका धारकांनी सदनिका घेऊन दोन वर्षे उलटूनही बिल्डरने अजूनही या सी-फेजसाठी पाण्याची अशी कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बिल्डर सध्या सी-फेजच्या सदनिका धारकांना बाहेरून पैसे देऊन पाणी पुरवठा करत आहे. पण जो पाणी पुरवठा करणारा पुरवठादार आहे तो कुठल्या गटारातील पाणी भरून सी-फेजच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये टाकतो की काय? असा प्रश्न आता सदनिका धारकांच्या मनात निर्माण झाला आहे. कारण जो पाणी पुरवठादार आहे तो वापरासाठी जे पाणी सी-फेजच्या टाक्यांमध्ये टाकतो त्या पाण्याचा अतिशय उग्र वास येत आहे. वास इतका भयंकर आहे की, कोणताही माणूस त्या पाण्याच्या टाकीच्या झाकणाच्या जवळही उभा राहू शकत नाही इतका त्या पाण्याचा उग्र वास सुटला आहे. अन तेच पाणी सध्या भोळेभाबडे सदनिका धारक रोजच्या दैनंदिन वापरासाठी वापरत आहेत. हे अतिशय धक्कादायक असूनही बिल्डर मात्र तेरी भी चूप मेरी भी चूप अशाच भूमिकेत वावरतांना दिसत आहे. जर उद्या सदनिका धारक नागरिकाच्या जीवाला धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदारी नक्की कोण घेणार? हाही प्रश्न अनूउत्तरीतच आहे.

जर बिल्डर फक्त नागरिक मागणी करतात म्हणून जर फक्त त्यांचे वरवरचे समाधान करत असेल तर, या अस्वच्छ पाण्यामुळे एखाद्या व्यक्तिच्या जीवाला धोका झाला तर त्याची जबाबदारी बिल्डर घेणार का? असा प्रश्न विचारण्याची वेळ सदनिका धारक यांच्यावर आली आहे. त्यातच ज्या सोसायट्या स्थापन करून दिल्या आहेत त्या कमिटिला नक्की कारभार कसा करायचा याचेही आकलन नसल्याने त्यात मोठ्या प्रमाणावर सी फेज मधील रहिवाशी सदनिका धारकांचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. सोसायट्या स्थापन करायला काही स्थानिक सदनिका धारकांचा विरोध असूनही काही अर्धवट माहिती असलेल्या कारभार्यानी घाई केली आणि आता सदनिका धारकाच्या अधिकाराचा विषय आला तर काही कारभारी कमिटीमधून पळ काढताना दिसत आहेत. काही कारभारी रात्रीचा दिवस करून सोसायट्या कशा चालवायच्या या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करत आहेत तर काहींना आपला अधिकार काय? आणि तो कसा वापरायचा? या पासूनच अनभिग्न असल्याचे समोर आले आहे.

बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे हा पाणी पुरवठादार फक्त टँकर पैशासाठी आणून रिचवत आहे पण ते पाणी कुठून आणले जाते ते पाणी वापरण्या योग्य आहे की नाही याचे दोघांनाही काही देणे घेणे नसल्याचे दिसून आले आहे. पण जर बिल्डर जर सी-फेजच्या सदनिका धारकांवर असाच अन्याय करत राहिला तर, एक दिवस या सदनिका धारकांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचे गंभीर परिणाम बिल्डरला भोगावे लागल्याशिवाय राहणार नाहीत. आता या जीवाशी खेळणार्या पाणी पुरवठादारावर बिल्डर काय कारवाई करणार? की फक्त अशीच एखाद्याचा जीव जाई पर्यंत बघ्याची भूमिका घेणार हेच पहावे लागेल.