भाजप आमदार महेश लांडगेंना जीवे मारण्याची धमकी.! पोलिसांच्या कंट्रोल रुमला आला फोन
प्रतिनिधी - आशिष ढगे पाटील, पिंपरी चिंचवड
भोसरी विधानसभेचे भाजपाचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी उदयकुमार राय नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे व त्याची चौकशी सुरू केलीय. तर याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल आहे.
मला भाजप आमदार महेश लांडगे यांना मारण्याची सुपारी मिळाली असून लवकरच मी त्यांना जीवे मारणार, असा धमकीचा फोन पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कंट्रोल रुमला आला. यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत धमकी देणाऱ्या तरुणाला अटक केली आहे.
उदयकुमार राय हा छत्तीसगडचा असून गेल्या पाच वर्षांपासून तो भोसरी मध्ये राहत आहे. त्याला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. नेमकं धमकी देण्याचं कारण अद्याप समजू शकलं नाही.