अंत्योदय लाभार्थ्यांना साड्या वाटप कधी? शासनाच्या घोषणेनंतरही लाभार्थी साड्यांपासून वंचित...
![अंत्योदय लाभार्थ्यांना साड्या वाटप कधी? शासनाच्या घोषणेनंतरही लाभार्थी साड्यांपासून वंचित...](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_65b60b289d879.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी : शासनाने २३ जानेवारी रोजी काढलेल्या आदेशात अंतोदय योजनेच्या लाभार्थ्यांना प्रजासत्ताक दिनापासून ते होळी सणापर्यंत साड्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात अजूनही लाभार्थ्यांना या साड्या मिळाल्या नसल्याने प्रतीक्षा केली जात आहे.
अयोध्येतील श्रीराममूर्ती प्रांत प्रतिष्ठा व आगामी होळी सणासाठी केंद्र व राज्य सरकारने दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांना १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्यासह अंत्योदय योजनेच्या लाभार्थी कुटुंबीयांस प्रत्येकी एक साडी मोफत देण्याचे जाहीर केले आहे. मात्र प्रजासत्ताकदिन दिवाळी सणापर्यंत साड्यांचे वाटप करण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने काढले असले तरी डिसेंबर २०२२ अखेर ज्या कुटुंबीयांचे अंत्यदय योजनेत नाव होते अशांनाच मोफत साडी देण्यात येणार असल्याचे असल्याने त्यानंतरच्या लाभार्थींचे काय, असा प्रश्न पुरवठा विभागाला पडला आहे.
शासनाने काढलेल्या या आदेशामध्ये गोरगरिबांचा सण उत्साहात साजरा व्हावा यासाठी अंत्योदय योजनेच्या लाभार्थी कुटुंबातील एका व्यक्तीस रेशन मधूनच मोफत साडी वाटप करण्याचे ठरविले आहे.३१ डिसेंबर २०२२ नंतर वर्षभरात काढलेल्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार नाही त्यामुळे साडी वाटप करताना भेदभाव केल्याचा आरोप वंचित लाभार्थ्यांकडून होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.या संदर्भातील आदेशात सुस्पष्टता यावी यासाठी अधिकाऱ्यांकडून शासनाकडे मार्गदर्शन मागवण्यात येणार आहे. मात्र असे असले तरी प्रत्यक्षात अजून जिल्हा पातळीवरून यंत्र माग महामंडळाला लाभार्थ्यांची संख्या व यादी सादर केलेली नाही त्यामुळे प्रजासत्ताक दिनाचा मूर्त टाळला आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये होळी सणाला या साड्या मिळतील का असा प्रश्नही लाभार्थ्यांकडून केला जात आहे.