राज्यात पुन्हा: गोळीबार.! भाविकांच्या धावत्या बसवर झाडल्या गोळ्या...
![राज्यात पुन्हा: गोळीबार.! भाविकांच्या धावत्या बसवर झाडल्या गोळ्या...](https://news15marathi.com/uploads/images/202403/image_750x_65ee98b4303ee.jpg)
NEWS15 मराठी रिपोर्ट - अमरावती
राज्यात मागील काहीदिवसांपासून गंभीर गुन्ह्यामध्ये मोठी वाढ झाली असून, विशेषतः गोळीबारीच्या घटना वारंवार घडत आहेत. पुणे, मुंबई, नागपूर येथील गोळीबारीच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा: एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन, नागपूर येथे परतत असताना; नागरिकांच्या खासगी प्रवासी मिनीबसवर बोलेरोमधून आलेल्या अज्ञात हल्लखोरांनी गोळी झाडल्याची घटना समोर आली आहे. तर या गोळीबारात चार जण जखमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ही घटना अमरावती - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास शिवणगाव नजीक घडली असल्याची महिती देण्यात आलीय. तर हल्ल्याचे कारण मात्र कळू शकलेले नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, नागपूर येथील भाविक MH14 GD6955 क्रमांकाच्या 17 सिटर टेम्पो ट्रॅव्हलरमधून रविवारी शेगाव येथे दर्शनासाठी गेले होते. सायंकाळी ते शेगावहून परतीच्या प्रवासाला निघाले. त्यांचे वाहन अमरावतीहून नागपूरकडे जात असताना; शिवणगाव ते टोलनाक्याच्या दरम्यान नागपूर येथून येत असलेल्या एका बोलेरो वाहनाने वळण घेऊन पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. काही वेळाने बोलेरो वाहन समोर गेले आणि या वाहनातील हल्लखोरांनी टेम्पो ट्रॅव्हलरवर गोळीबार सुरू केला. यात एक गोळी चालक खोमदेव कवडे यांच्या हाताला स्पर्श करून गेल्याने ते जखमी झाले. चालकासह इतर चार जण या हल्ल्यात जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्याची माहिती देण्यात आलीय.
तर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी पुन्हा आपले वाहन वळवून मोर्शीच्या दिशेने त्यांनी पलायन केले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसून, टेम्पो ट्रॅव्हलरच्या जखमी चालकाने प्रसंगावधान राखून वाहन रस्त्यात कुठेही न थांबवता थेट तिवसा पोलीस ठाण्यात नेले आणि या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी जखमींना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून, नियंत्रण कक्षाला कळवले. हल्लेखोर हे बोलेरो वाहनातून आले होते आणि त्यांनी तोंडाला दुपट्टे बांधलेले होते अशी माहिती वाहनातील पर्यटकांनी दिली.
या हल्ल्यामागे लुटमारीचा हेतू होता की अन्य कोणता; कारण याचा शोध पोलीस घेत आहेत आणि पुढील अधिक तपास चालू केला आहे.