ग्रामीण भागात पर्यटकांनाही भुरळ घालते "भात आवणी...

NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण
नाशिक / दिंडोरी : पावसाळा सुरू झाला की शहरी पर्यटकांना जसे धबधबे आणि निसर्ग पर्यटनांचे वेध लागतात. त्यांचवेळी ग्रामीण भागातील बळीराजा आपल्या शेतातील भाताची आवणी करण्यासाठी मोठी लगबग सुरू करतो. पहिल्या पावसात भाताची रोपे करायची आणि पावसांने जोर धरला की एका दमात कुटुंबातील सर्वानी भाताची आवणी करायची अशी परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. कामानिमित्त शहरात गेलेली सर्व ग्रामस्थ मंडळी भात लावणीसाठी आवर्जून आपल्या गावाला मोठ्या आनंदाने येत असतात. नातेवाईक ही एकमेकांच्या मदतीसाठी आवर्जून दाखल होतात.ग्रामीण भागातील शेतकरी वर्गासाठी भातलावणी एकप्रकारे स्नेहमेळावाच मानला जातो.
यंदा दिंडोरी तालुक्यात भात लागवडीला उशीरा सुरुवात झाली असली तरी ग्रामीण भागातील विशेष तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील लखमापुर,करजंवण,दहेगाव, वारे,टिटवे,कोशिंबे,बंधारपाडा,बाडगीपाडा,भनवड,ननाशी,वनारे,कोकणगादहवी,टाक्याचा पाडा,देवठाण, पिंपरखेड,खेडला,ओझरखेड, पुणेगाव,फाफशी,पांडाणे,पिंप्री, अंचला,माळेगाव अशा अनेक ठिकाणच्या शेतकरी बांधवामध्ये भाताची आवणी करतांना आनंद साजरा केला जातो.ग्रामीण भागात भाताची आवणी करताना भाताची जी रोपे तयार केलेली असतात.ती रोपे शेतातून काढून त्यांची गावातील ग्रामदेवतेसमोर वाजतगाजत मिरवणूक काढून पुजा केली जाते. यात आदिवासी माता भगिनी आदिवासी भागातील भाताच्या आवणीचे गाणे,विविध प्रकारचे गिते म्हणत भात रोपांची पुजा करतात. नंतर ज्याठिकाणी भात आवणी करायची असते.त्या शेतातील भुमीची मोठ्या भक्ती भावाने ग्रामदैवत आठवुन पुजा नैवेद्य अर्पण करतात.
ग्रामीण भागातील भाताची आवणी म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. यासाठी वाफे पध्दतीने मोठ्या प्रमाणावर चिखल केला जातो. व त्यामध्ये महिला वर्ग ओळीने हातामध्ये भाताची रोपे,व पाठीवर घोंगडी पांघरूण पावसांची व भात आवणी पारंपरिक गाणे म्हणत आवणी करतात. हे वातावरण पाहाण्यासारखे असते. यावर्षी तालुक्याचे माजी आमदार धनराज महाले यांनीही तालुक्यातील जनतेचे काम करता करता वेळात वेळ काढून आपल्या स्वतःच्या शेतामध्ये स्वतः राबवून अवनीचे काम केले.हे वातावरण पाहण्यासाठी शहरी भागातील नागरिक पावसाळ्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.
चौकट
ग्रामीण भागातील भाताची आवणी म्हणजे एकप्रकारे पर्वणीच म्हणावी लागेल .यावेळी आमचे कामानिमित्ताने बाहेरगावी,शहरांकडे गेलेले सर्व गावंकरी मंडळी भात आवणीला एकत्र येतात व भाताची पेरणी करतात.यामध्ये सध्या वेगवेगळ्या वाणांची बियाण्याची रोपे तयार करून वेगवेगळ्या आकारांची वाफे तयार करून भाताची लागवड करतात. त्यामध्ये सर्व शेतकरी सध्या दोरी भात लागवडीला मोठ्या प्रमाणांवर पसंती देतात.
यंदा पावसांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने भाताची रोपे तयार करण्यात उशीर झाला आहे. त्यात जी रोपे तयार केली. त्यांनी ही मध्यंतरी च्या काळात पाणी कमी पडल्याने ती मोठ्या प्रमाणावर पिवळी पडली होती.त्यामुळे यंदा खरीप हंगामातील या मुख्य भाताची उत्पादन क्षमता घडते की काय ?अशी भीती निर्माण झाली आहे.
जगन गवळी (भात उत्पादक शेतकरी )