छत्तीसगडच्या कामगारास, किनगाव पोलिसांचा मदतीचा हात...
![छत्तीसगडच्या कामगारास, किनगाव पोलिसांचा मदतीचा हात...](https://news15marathi.com/uploads/images/202307/image_750x_64b6378d7c7af.jpg)
NEWS15 प्रतिनिधी - असलम शेख
लातूर : जनतेचा पोलीसांकडे बघण्याचा दृष्टीकोन मारझोड करणारा, खऱ्याच खोट अनं खोट्याच खर, हप्ता खोर असा असते? पंरतू, पोलीस हा शेवटी माणूस असतो; आपला जीव धोक्यात घालून जनतेचे संरक्षण करतो हे कटू सत्य आपण अनेकदा विसारतोच. असाच वर्दीतील माणुसकीचा एक प्रसंग किनगाव पोलिसांनी घडवून दिला आहे. अहमदनगरहून - छतीसगडला सायकलवर जाणाऱ्या कामगारास उपचार करून, आर्थिक मदत देत; बस व रेल्वे मध्ये बसवून आजारी आईला भेटण्याचा मार्ग शनिवारी पोलीसानी सुलभ केला. 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' ब्रीदचा प्रत्यय किनगाव पोलिसांनी दाखवल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी छत्तीसगडमधील एक युवक कामगार हिमांशू पुराणलाल मरकाम ( वय २०) रा . गडडोंगरी, ता. नगरी, जि. धमतरी राज्य छत्तीसगड हा महाराष्ट्रातील अहमदनगर येथे कामाच्या शोधात आला होता. एका दुकानावर त्यास कामगार म्हणून काम मिळाले. चार दिवस झाले अनं आई आजारी असल्याचा निरोप गावाकडून आला. मालकास कामाचा मोबदला मागितला असता मालकांनी त्यास कामाचा मोबदला न देता एक जुनी सायकल दिली. ती सायकल घेऊन हा कामगार मोबाईलवर रोड मॅप लावून छत्तीसगडकडे निघाला. तो शनिवारी किनगाव जवळील परचंडा फाटा येथे आला असता; तो सायकलवरून पडून जखमी झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यास किनगाव पोलीस स्टेशनमध्ये आणून अधिक चौकशी करून आधार कार्डद्वारे संपूर्ण खातरजमा केली. त्यांच्या फोन वरून गावकडील सर्व परिस्थिती जाणून घेतली. ही सर्व कामगाराची वाईट आवस्था पाहता पोलीसातला माणूस जागा झाला आणि सर्व पोलीसानी एकत्र येवून वर्गणी जमा करून, माणूसकी दाखवत आईच्या आजाराला व त्यांच्या मुळगावी जाण्यापर्यंतची आर्थिक मदत केली.
त्याची जुनी सायकल पोलीस स्टेशनमध्ये ठेवून अहमदपूर येथून नांदेड बसमध्ये शनिवारी दुपारी बसवून, छत्तीसगड पर्यंतचे तिकिट काढून रेल्वे मध्ये बसवून आजारी आई व पत्नीला भेटण्याचा मार्ग सुलभ करून दिला आहे. ह्या सर्व मानवतेच्या प्रसंगामुळे पोलीसाचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. यासाठी स.पो. नि. भाऊसाहेब खंदारे, पोलीस उपनिरीक्षक संदीप अन्यबोईनवाड, व्यंकट महाके, मल्लिकार्जुन कल्याणे, सुनील श्रीरामे, गंगाधर डोईजड आदी पोलिस कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.