संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज संस्थानने केला "कादवा" चा सन्मान

संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज संस्थानने केला "कादवा" चा सन्मान

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

कादवा सहकारी साखर कारखाना मातेरेवाडी नेहमी सामाजिक उपक्रम राबवतआलेलाआहे.सालाबादाप्रमाणे याही वर्षी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रेतील पायी दिंडीतील वारकरी भक्तांची मोफत तपासणी व औषधोपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.दिंड्यांनी प्रस्थान केलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी चेअरमन,व्हा.चेअरमन व संचालक मंडळ,सभासद,वारकरी संप्रदायातील प्रतिष्ठित नागरिक,अधिकारी व कामगार बांधव यांच्या सहकार्याने व शुभहस्ते ह्या शिबिरांचे आयोजन व उदघाटन करण्यात आले.

पायी दिंडीतील वारकरी ज्या ठिकाणी विसाव्याच्या ठिकाणी थांबले होते तेथे प्रत्यक्ष जाऊन वारकरी भक्तांची तपासणी करण्यात आली.वडाळीभोई ते आडगाव (नासिक),दुधखेड ते दिंडोरी,वणी ते परमोरी,बोपेगाव ते शिवनई वरवंडी, करंजवण ते उमराळे,उमराळे ते तिल्लोळी - साडगाव, गिरणारे ते हिरडी फाटा- महिरा वणी,नासिक महानगर,सातपुर ते ब्रम्हा व्हॅली ह्या मार्गाने पायी दिंडीतील वारकरी भक्तांची विसाव्याच्या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले.

वारीतील शेवटचे तीन दिवस एक टीम ब्रम्हमुर्ती दामोदरजी महाराज खेडगावकर आश्रम प्रवेशद्वार त्र्यंबकेश्वर रस्त्यावर थांबुन वारकरी भक्तांची तपासणी करत होती.तर दुसरी टीम वेगवेगळ्या दिंड्यांच्या विसाव्याच्या ठिकाणी जाऊन तपासणी व औषधोपचार सुविधा उपलब्ध करून देत होती.यात्रेच्या दिवशी ज्या जागेवर वारकरी दिंडी मुक्कामी होती त्या विसाव्याच्या ठिकाणी भाविक भक्तांची तपासणी व औषधोपचार करण्यात आले. सामाजिक उपक्रमांतर्गत दरवर्षी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रेतील भाविक भक्तांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन कादवा सहकारी साखर कारखाना सतत करत आलेला आहे.ह्या वर्षी जास्तीत जास्त वारकरी भक्तांची तपासणी व औषधोपचार होणेसाठी वारी सूरू झालेल्या ठिकाणापासून ते त्र्यंबकेश्वर येथे विसाव्याच्या ठिकाणी मुक्कामी थांबलेल्या जागेपर्यंत वारकरी भक्तांना वैद्यकीय साधने व सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

कादवा कारखान्याने यशस्वीपणे राबवलेल्या ह्या सामाजिक उपक्रमाला वारकरी संप्रदाय व भाविक भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, सहभाग लाभला.याची दखल संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज संस्थान च्या विश्वस्त मंडळाने घेतली.वारकरी सांप्रदायाचे प्रमुख हभप पांडुरंग पाटील गडकरी यांच्या सहकार्याने कादवा संचालक मंडळ ह्यांना सन्मानित करण्यासाठी संस्थान ने आमंत्रित केले.प्रातिनिधिक स्वरूपात संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प निलेश महाराज गाढवे,सचिव अॅड.सोमनाथ घोटेकर व इतर सदस्य यांच्या शुभहस्ते कादवाचे संचालक मधुकर संपतराव गटकळ,ह.भ.प पांडुरंग पाटील गडकरी,कादवा सभासद बाळासाहेब संपतराव गटकळ,वाळु ग्यानु गटकळ,दिनकरराव ठुबे,ह.भ.प साहेबराव महाले,वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदिप तिडके यांनी श्री निवृत्तीनाथ महाराज संस्थान चा सत्कार स्वीकारला. 

याप्रसंगी बोलतांना जिल्ह्यातील ऊस उत्पादक अडचणीत असतांना कादवा ने केलेले सहकार्य व वारकरी संप्रदाय व भाविक भक्तांच्या केलेल्या सेवेबद्दल श्री निवृत्तीनाथ महाराज संस्थानने कादवा विषयी गौरवोदगार काढले.