राजकीय : खेडमध्ये राजकीय भूकंप: उबाठाचे गणेश नाणेकर बंडाच्या तयारीत? या गटात तिरंगी लढतीचे संकेत..!

राजकीय : खेडमध्ये राजकीय भूकंप: उबाठाचे गणेश नाणेकर बंडाच्या तयारीत? या गटात तिरंगी लढतीचे संकेत..!

चाकण (प्रतिनिधी, आशिष ढगे पाटील): पुणे जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच खेड तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. विशेषतः नाणेकरवाडी–महाळुंगे जिल्हा परिषद गटात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असून, उबाठा पक्षाचे इच्छुक उमेदवार गणेश नाणेकर यांच्या उमेदवारीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. तिकीट मिळण्याची आशा मावळल्याने नाणेकर आता इतर पक्षांकडे चाचपणी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अमोल पवारांचे पारडे जड?

नाणेकरवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि उबाठा पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून गणेश नाणेकर यांची ओळख आहे. मात्र, याच गटातून उबाठाचे ज्येष्ठ नेते अमोल पवार यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. सध्याची परिस्थिती पाहता पक्षाची उमेदवारी पवारांच्या पदरात पडण्याची दाट शक्यता आहे. हाच अंदाज आल्याने गणेश नाणेकर यांनी आपली पुढील राजकीय दिशा ठरवण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे समजते.

आयात उमेदवारांची गोची..

​या निवडणुकीत महायुती (भाजप-शिंदे शिवसेना) विरुद्ध उबाठा आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. अनेक 'आयात' उमेदवारांनी आर्थिक तडजोडीच्या जोरावर तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र सर्वच पक्षांनी "आधी स्वपक्षातील निष्ठावंतांना संधी, मग इतरांचा विचार" असा पवित्रा घेतल्याने या आयात उमेदवारांची मोठी कोंडी झाली आहे.

​निर्णायक भूमिका कोणाची?

​या गटातील विजयाचे गणित ठरवण्यासाठी काही प्रमुख नेत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे:

​स्वर्गीय आमदार सुरेश गोरे यांचे कुटुंब.

​शिवसेना नेते अतुल देशमुख.

​शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर.

नाणेकर काय पाऊल उचलणार?

गणेश नाणेकर यांच्यासमोर सध्या मोठे राजकीय आव्हान उभे ठाकले आहे. अपक्ष लढणे या गटात जिकिरीचे असल्याने, ते उबाठावर नाराज होऊन थेट शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर नाणेकरांनी पक्षांतर केले, तर उबाठाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.