स्थानिक गुंडा पासून आमचे संरक्षण करा, चाकण मधील उद्योजकांची पोलीस प्रशासनाकडे मागणी...!

स्थानिक गुंडा पासून आमचे संरक्षण करा, चाकण मधील उद्योजकांची पोलीस प्रशासनाकडे मागणी...!
स्थानिक गुंडा पासून आमचे संरक्षण करा, चाकण मधील उद्योजकांची पोलीस प्रशासनाकडे मागणी...!
स्थानिक गुंडा पासून आमचे संरक्षण करा, चाकण मधील उद्योजकांची पोलीस प्रशासनाकडे मागणी...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : चाकण औद्योगिक क्षेत्रातील दडपशाही आणि गुंडगिरी यांचे उच्चाटन करून दहशत माजविणाऱ्या काही संघटना आणि त्यांच्या तथाकथित नेत्यांच्या जाचातून उद्योगांना दिलासा तसेच मुख्य महामार्गावरील वाहतूक कोंडी,रस्ते दुरुस्ती करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.

यावेळी चाकण परिसरातील अनेक कंपनी धारकांनी स्थानिक राजकीय व्यक्तीच्या विरोधात तक्रारीचा पाढा वाचला. स्थानिक राजकीय व्यक्तीमुळे आम्हाला काम करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. चाकण परिसरात अनेक नामांकित कंपन्या या परिसरात काम करत आहेत. आम्ही एकूण १० लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. पण आम्हाला ज्या अडचणी येतात त्यांची सोडवणूक करण्यासाठी आज आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो.

महाराष्ट्रातून मोठे उद्योग उत्तर प्रदेशात जात आहेत. त्यात काही चाकण परिसरातीलच उद्योजक आहेत. उत्तर प्रदेश आम्हाला उत्तम अशा सुविधा देण्यास तयार आहेत हा आपल्या राज्यासाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे कि आम्हाला संरक्षण द्यावे.

त्यातील महत्वाची बाब म्हणजे माथाडीमध्ये आम्हांला खूप त्रास होत आहे. त्यात पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे. चाकण मधील वाहतूक कोंडीमुळे आम्हाला कौशल्य पूर्ण कामगार मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. त्याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष द्यायला हवे असे मागणी कंपनी प्रतिनिधी यांच्याकडून करण्यात आली.

सर्व बाबीचा विचार करता काही स्थानिक उद्योजकांनी यावेळी बोलताना सांगितले कि, कंपनी प्रतिनिधी स्थानिक व्यक्तीचा त्रास म्हणून सांगत आहेत. पण आम्ही आमच्या जमिनी या उद्योजकांना दिल्या आहेत तर प्रथम कंपनीतील कामासाठी आमचाही तितकासा हक्क मिळायला हवा. आमचा जर कंपनीने विचार केला तर नक्कीच कंपन्याना आम्ही सहकार्यच करू अशी भावना व्यक्त केली.

यावेळी कंपन्यामध्ये होत असलेल्या चोऱ्या, वाहतुकीच्या संदर्भातील समस्या, महिला सुरक्षेचा मुद्दा यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. यातील मूळ मुद्दा म्हणजे कंपन्या स्वतःच्या शंभरो एकर जागा घेतात पण कामगारांच्या गाड्या गेटच्या बाहेर लावण्यास सांगतात. त्यासाठी त्यांनी एकतर आपल्या कर्मचाऱ्यांच्या गाड्या लावण्याची व्यवस्था गेटच्या आत करावी किंवा जिथे गेटच्या बाहेर गाड्या लावतात तिथे सिसिटीव्ही यंत्रणा बसवावी ज्यामुळे अशा वाहन चोऱ्या रोखता येतील. त्याच बरोबर महिलांच्या सुरक्षेबद्दल पोलीस प्रशासनाच्या बरोबर कंपनीनेहि महिला कर्मचारी सुरक्षित राहण्यासाठी उपाय योजना करायला हव्यात त्यासाठी पोलीस प्रशासन सदैव कटीबद्ध आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीतील महत्वाचा प्रश्न समोर येतो तो म्हणजे वाहतूक कोंडी यावर वाहतूक पोलीस हे फक्त नियोजन करू शकतात. रस्त्यांची झालेली दुरावस्था, अरुंद रस्ता, रस्त्याच्या कड़ेची अतिक्रमने काढणे हे संबंधित विभागाचे काम आहे. त्यामुळे या सर्व प्रश्नात एकत्रित येऊन काम करायला हवे आणि त्यात तितकासा कंपन्याचा सहभाग असायला हवा.

ब्रिजस्टोन इंडिया कंपनीमध्ये फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी, सहाय्यक आयुक्त मनोज लोहिया, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपायुक्त परिमंडळ १  विवेक पाटील, सहा.आयुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे, शिवहरी हलन, कमल कचोलीया, श्याम अगरवाल, विनोद जैन, प्रदीप बापट, मुकुंद पुरानी, सुनील सावरकर, सारंग जोशी, जयेश सुळे, जॉन, दिपक धायगुडे, मनीष फणसाळकर, शिवाशीष दास, फेडरेशनचे सचिव दिलीप बटवाल आदिंसह औद्योगिक क्षेत्रातील सर्व कंपनीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत चाकण औद्योगिक क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था आणि इतर संबंधित समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कंपन्यांच्या वतीने उपस्थित अधिकाऱ्यांनी पुणे- नाशिक, तळेगाव-शिक्रापूर या प्रमुख महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी योग्य नियोजन करावे?याच महामार्गावरील खड्डे त्वरित बुजवावेत?एमआयडीसी टप्पा दोन मधील गुंडगिरीला आळा घालण्यासाठी वासुली फाटा स्वतंत्र पोलीस चौकी सुरू करावी ? रात्रीच्या वेळी कामगारांना होणाऱ्या मारहाण, चोऱ्या, लुटमारच्या घटना रोखण्यासाठी पावले उचलली जावीत? आदी विषय मांडले. यावेळी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले की,पोलीस खात्याकडून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात येईल. एमआयडीसीत माथाडी, ठेकेदारी, स्क्रॅपसाठी दादागिरी करणाऱ्या गुन्हेगारांवर निश्चितच कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही देतो. रात्रीच्या वेळी कामगारांच्या सुरक्षेसाठी पोलीस गस्त वाढण्यात येईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन पाटील यांनी केले.