मी अनुभवलेले अशोकराव भांगरे....

मी अनुभवलेले अशोकराव भांगरे....

संपादकीय......!आशिष ढगे पाटील 

अशोक यशवंतराव भांगरे...! तसे माझे आणि भांगरे साहेबांचा जास्त संपर्क कधी आला नाही. माझ्या जीवनात आणि त्यांच्या हयातीत एक प्रसंग समोरासमोर यायचा आला होता. २०१९ ची विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले अन पिचड घराण्याच्या विरोधात कोणता उमेदवार उभा राहणार याची सर्व तालुकाभर चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. अशोकराव भांगरे, तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य अन विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे, अशोकराव भांगरे यांच्या सुविद्य पत्नी तत्कालीन जिल्हा परिषद सदस्या सुनीताताई भांगरे, अकोले पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ, शिवसेनेचे जेष्ठ नेते मधुकर तळपाडे, सतीश भांगरे यांची नावे त्यावेळी विधानसभा उमेदवारीसाठी प्रामुख्याने चर्चेत होती. अन या चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री मधुकर पिचड व त्यांचे सुपुत्र तत्कालीन आमदार वैभव पिचड यांनी नाही नाही म्हणून भाजपात प्रवेश केला अन तालुक्यातील राजकीय गणिते बदलण्यास सुरुवात झाली.

ज्या क्षणी पिचड कुटूंबाने भाजपात प्रवेश केला त्याच काळात भाजपा पक्षांकडून जिल्हा परिषद सदस्य असणारे डॉ. किरण लहामटे यांनी तालुक्यात पक्ष विरहित काम करण्यास सुरुवात करून विधानसभा लढण्याचे संकेत दिले. त्यानंतर इच्छुक उमेदवारांनी वरिष्ठ पातळीवर वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली. प्रथमतः डॉ. किरण लहामटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांची भेट घेतली. त्या भेटीचा मीही साक्षीदार होतो, त्यावेळी पवार साहेबांच्या पिचड घराण्याने पक्ष सोडून जाणे जिव्हारी लागले होते. त्यांनी डॉ. किरण लहामटे यांना सांगितले कि, डॉक्टर मला कोणत्याही परिस्थितीत पिचड यांना पराभूत करायचे आहे आणि त्यासाठी तुम्हा सर्व इच्छुक उमेदवारांना एकत्र यावे लागेल. यावर लहामटे डॉक्टर यांनी आपणच सर्वांना एकत्र येण्याची विनंती करावी. त्यावर पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना फोन करून सर्वांना भेटण्यासाठी पुणे येथे बोलावले.

पुणे येथे शरदचंद्रजी पवार यांच्या घरी भेटण्याची तारीख आणि वेळ ठरली. पण त्यावेळी डॉ. किरण लहामटे यांनी सोडून कोणीही स्वतःचा पक्ष सोडण्याचे धाडस केले नव्हते. पवार साहेबांच्या भेटीची गुप्तता  पाळून सर्व विरोधी उमेदवार पवार साहेबाना भेटण्यासाठी पुण्यात दाखल झाले. त्यात अशोकराव भांगरे व सुनीताताई भांगरे याही होत्या. त्यात झाले असे माझा आणि डॉ. लहामटे यांचा अगोदर पासूनच स्नेह असल्याने पुण्यात डॉक्टर आले कि ते मला घेऊनच पुढे जात असत. पण मी नक्की काय करतोय याची डॉक्टर यांना कल्पना नव्हती. पण मी पत्रकारिता करतोय याची त्यांना पूर्ण कल्पना होती. पवार साहेबांच्या भेटीसाठी डॉक्टर लहामटे सोडून इतर सर्व इच्छुक साहेबांच्या घरी पोहचले होते. आम्ही वाहतूक खोलब्यामुळे उशिरा पोहचलो आणि भांगरे साहेबांनी जसे मला पाहिले तसे त्यांनी डॉक्टर लहामटे यांचा यथोचिच समाचार घेतला. आणि त्यानंतर मलाही खडसावून सांगितले कि, आशिष आम्ही अजून अधिकृत पक्ष सोडलेला नाही जर तुझ्या बातमीमुळे काही नामुष्की ओढवली तर माझ्या एवढं वाईट कुणी नाही. माझ्यात आणि त्यांच्यातही थोडी शाब्दिक चकमक उडाली.

त्यानंतर बरेच पुला खालून पाणी वाहून गेले नंतर भांगरे साहेबही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. त्यांनी मनाचा मोठे पणा दाखवून एकास एक उमेदवार देऊन वैभव पिचड यांचा दारुण पराभव केला. त्यानंतर ज्या दिवशी २०१९ च्या विधानसभा निवडणूकीचा निकाल लागला आणि आमदार डॉ. किरण लहामटे यांची भव्य मिरवणूक सुरु होती ती मिरवणूक अकोले न्यायालयाच्या समोर आली. त्यावेळी त्या मिरवणूक गाडीवर भांगरे साहेबही होते. त्यांनी मला बघताच मिरवणुकीतुन बाजूला येऊन ओके झाले ना आशिष, राजकारणात काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात असे म्हणून मला हस्तोदोलन करून पुन्हा मिरवणुकीत सहभागी झाले.

त्यानंतर भांगरे साहेब आणि माझी वर वर भेट होत राहिली पण तसा जवळचा संबंध आला नाही. विचारांचे मतभेद असू शकतात पण ते सोडून देऊन पुन्हा माणसांना जवळ करणारा दिलदार नेता म्हणजे अशोकराव भांगरे साहेब होते. अनेक पराभव पचवुनही पुन्हा त्याच जोमाने, उमेदीने, जोशाने काम करणारा नेता अशोकराव भांगरे साहेब यांचा सारखा होणे नाही.

माणूस असताना त्याचा आपण द्वेष करतो, मत्सर करतो, त्याला नावे ठेवतो, त्याच्या चुका काढतो पण एवढे होऊनही विरोधकालाही आपलेसे करणारा नेता म्हणजे अशोकराव भांगरे साहेब... भांगरे साहेबांच्या जाण्याने अकोले तालुक्यातील राजकीय क्षेत्राला मोठा धक्का तर बसला आहे. पण त्यांच्या जाण्याने अकोले तालुक्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

भांगरे साहेबांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.. भांगरे साहेबांना News15 मराठी वाहिनीकडून भावपूर्ण श्रद्धांजली...