सामाजिक : खराबवाडी गावात रंगभूमीवरील जिद्दीचा आणि सर्जनशीलतेच्या अनोखा नाटक प्रयोग, सांस्कृतिक वारसा अनुभवण्याची पर्वनी..!

सामाजिक : खराबवाडी गावात रंगभूमीवरील जिद्दीचा आणि सर्जनशीलतेच्या अनोखा नाटक प्रयोग, सांस्कृतिक वारसा अनुभवण्याची पर्वनी..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : खराबवाडी गावातील हनुमान तरुण नाट्य मंडळाच्या ७५ व्या रोप्य महोत्सव वर्षानिमित्ताने गावातील जेष्ठ आणि तरुण असा मिलाप करून "चाळ बांधिले तुझ्यासाठी" या तीन अंकी विनोदी आणि अविस्मरणीय नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक कलाकारानी अभिनय करत असलेले हे परिसरातील पहिलेच नाटक असल्याने या नाटकाची रसिक अदाकारी बघण्यासाठी रसिक श्रोत्यांनी उपस्थिती लावण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे.

आताच्या युगात मनोरंजनाच्या नावाखाली आज सोशल मीडियावर, मोबाईल स्क्रीनवर रमणाऱ्या या युगात, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील "खराबवाडी" गावातील काही जेष्ठ आणि तरुण कलाकारांनी एकत्र येऊन एक वेगळा आदर्श घालून देण्याचा प्रयत्न केला आहे. खराबवाडी गावातील काही उपजत कला अवगत असणाऱ्या उत्साही मंडळीनी ज्यांनी कधीही रंगमंचावर अभिनय केलेला नाही. अशा कलाकारांनी एकत्र येऊन मनाला भावेल असा विषय घेऊन नाटक विनण्याचा निर्णय घेतला आहे. असे पाऊल म्हणजे फक्त एक प्रयोग नव्हे, तर हरवलेल्या लोककलेचा आणि आपल्या सांस्कृतिक परंपरेला पुन्हा उजाळा देणारा प्रयत्न म्हणावा लागेल.

जुन्या काळी गावागावात विविध देवांच्या जत्रा, सण, कीर्तन, भारूड, नाटक यांचा पारंपारीक सांस्कृतिक सोहळा आयोजित केला जात असे. गावातील कला अवगत असलेली तरुण मंडळी रात्रीच्या वेळेस नाटकाची तालीम करून लोकांसमोर अप्रतिम सादरीकरण करायचे. त्या नाट्यसंस्कृतीतून गावात एकजुट, सामाजिक जाणीव, एकता आणि कला यांचा संगम घडवून आणला जात होता. पण कालांतराने जस जशी वैज्ञानिक प्रगती झाली तशी हि परंपरा हरवू लागली. आज खराबवाडी गावातील काही जेष्ठ व तरुण कलाकारांनी पुन्हा तीच ऐतिहासिक कलेची परंपरा जिवंत ठेवण्याचा धाडसी निर्धार करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणताही अभिनयाचा पूर्वानुभव नसतानाही गावातील मंडळी आपली दैनंदिन कामे करून खास नाटकासाठी तालीम करत आहेत. संवाद पाठ करत आहेत, रंगमंचाची मांडणी करत आहेत. हा फक्त मनोरंजनाचा कार्यक्रम नसून, सामूहिक प्रयत्न आणि संस्कृतीच्या जपणुकीचा एक सुंदर मिलाप आहे.

चला तर मग, ५ नोव्हेंबर २०२५ रोजी ठीक रात्री : ८ वाजता या नाटकाचा प्रत्यक्ष प्रयोग होणार आहे. ही तारीख गावाच्या सांस्कृतिक इतिहासात नवा अध्याय लिहिणारी अशीच ठरणार आहे.

खराबवाडी गावातील उदयमुख कलावंतांना सलाम..! त्यांच्या मेहनतीला आणि जिद्दीला मनापासून शुभेच्छा..!

ही कला नव्या पिढीला प्रेरणा देवो, आणि गावागावात पुन्हा नाट्यसंस्कृतीचा उदय होवो...

“जे मंचावर उभं राहण्याचं धाडस करतात, तेच आयुष्याच्या रंगमंचावर विजय मिळवतात.” या वाक्याची प्रचिती सर्वांना येवो हिच सदिच्छा..!