पदस्थापना झाली पण केंद्रप्रमुख गेले कुठे?

पदस्थापना झाली पण केंद्रप्रमुख गेले कुठे?

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत जुन अखेर रिक्त असलेल्या 22 जागांसाठी पदोन्नती प्रक्रिया शुक्रवार (दि. 26) रोजी पार पडली. त्यात 18 पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुख या पदावर समपुदेशन पध्दतीने पदोन्नती देण्यात आली आहे. त्यात पेठ तालुक्यातील करंजाळी बीटासाठी 1 केंद्रप्रमुख देण्यात आले होते. परंतू ते केंद्रप्रमुख हजर होण्यासाठी गेलेच नसल्याने नेमके ते केंद्रप्रमुख गेले कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे. समपुदेशन पध्दतीने पदोन्नती देतांना प्रत्येक तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत पेठ तालुक्याला 1 केंद्रप्रमुख दिलेले असतांना प्रक्रिया संपल्यानंतर त्यांना इतरत्र नेमणूक दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षण विभागाची ‘सेटींग’ प्रक्रियाची चर्चा सुरु आहे. 

गेल्या 9 वर्षांपासून केंेंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरण्यासाठी शिक्षकांकडून मागणी होत होती. सेवाज्येष्ठतेनुसार केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तालुकानिहाय सेवाज्येष्ठतेनुसार पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक या निकषाने  समपुदेशन पध्दतीने प्रक्रिया राबवित 18 शिक्षक, मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नती देण्यात आली. यावेळी प्रत्येक तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत पदोन्नतीने केंद्रप्रमुखांना तालुक्यातील बीट जाहीर करण्यात आले. यावेळी पेठ तालुक्याला 1 केंद्रप्रमुखाची पदस्थापना केल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतू पदस्थापना प्रक्रिया संपल्यानंतर पुन्हा त्यात बदल करुन पेठ तालुक्याला दिलेल्या केंद्रप्रमुखाला इतर ठिकाणाची पदस्थापना देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे पेठ तालुक्यात सदर केंद्रप्रमुख हजर होण्यासाठी गेले नसल्याने नेमके ते केंद्रप्रमुख गेले कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे.                                                नुकतीच समपुदेशन पध्दतीने शिक्षक व मुख्याध्यापकांमधुन सेवाज्येष्ठतेनुसार  केंद्रप्रमुखांची पदोन्नती प्रक्रिया जिल्हा परिषदेत पार पडली. यावेळी प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकार्‍यांनी हजर राहण्याचे आदेश प्रशासनाकडून आम्हाला मिळाले होते.त्यामुळे मी स्वत: या प्रक्रियेवेळी उपस्थित होतो. यावेळी एका केंद्रप्रमुखाची पेठ तालुक्यातील करंजाळी बीटासाठी पदस्थापना जाहीर झाली होती. परंतू ते अद्याप पर्यंत हजर होण्यासाठी आलेले नाहीत. 

 प्रशांत जाधव, गटशिक्षण अधिकारी, पेठ

अशी झाली पदस्थापना

बागलाण -1,  देवळा -2, दिंडोरी -3, मालेगाव -2, इगतपुरी -2, नाशिक -1, येवला -1, सिन्नर -1, पेठ -1, निफाड -1, नांदगाव -2, त्र्यंबकेश्‍वर -1