जिल्हा परिषद पेसा क्षेत्रात सेवानिवृत्त शिक्षक कंत्राटी पध्दतीने भरणार...

जिल्हा परिषद पेसा क्षेत्रात सेवानिवृत्त शिक्षक कंत्राटी पध्दतीने भरणार...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

नाशिक जिल्ह्य़ातील पेसा क्षेत्रातील शाळांमधील रिक्त पदांवर आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषदेमार्फत सेवानिवृत्त शिक्षकांच्या कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या करण्यात येणार आहे अशी माहिती दिंडोरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी यांनी दिली.शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी शासन आदेशानुसार नुकतेच पत्र जारी केलेले असून त्यानुसार पवित्र प्रणाली मार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह (निवृत्ती वेतन मंजूरी आदेश व दहावी प्रमाणपत्रक इ.) पात्र इच्छुक सेवानिवृत्त शिक्षकांनी दि.२६ जुलैपर्यंत गटशिक्षणाधिकारी,दिंडोरी कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन दिंडोरी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी यांनी केलेले आहे.या नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्ष राहील यासाठी मानधन रुपये वीस हजार प्रति महिना कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त असणार आहे. 

जिल्हा परिषदेच्यावतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील.नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील या आशयाचे बंधपत्र हमीपत्र करून द्यावे लागेल शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती, विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही असे बंधपत्र / हमी पत्रात नमूद करावे लागेल. सदर नियुक्ती ही जिल्हा स्तरावरून जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांवर करण्यात येणार असून नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंतच असणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज,वयाचा पुरावा,सेवा कालावधीत कोणत्याही प्रकारची चौकशी झालेली नाही अथवा न्यायालयीन प्रकरणी वादी /प्रतिवादी नसल्याचे स्व प्रमाणपत्र,सेवा कालावधीत कोणत्याही प्रकारची शास्ती /निलंबन अथवा अन्य कारवाई झालेली नसल्याचे स्व प्रमाणपत्र, सेवानिवृत्ती आदेश,सेवा कालावधीत विशेष पुरस्कार /पारितोषिक मिळाले असल्यास त्याचा पुरावा आदी कागदपत्रांसह अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले असून नियुक्ती आदेश दिल्यानंतर शारीरिक दृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र व करारनामा करून देणे बंधनकारक असणार आहे.