महाळुंगे एमआयडीसी पोलीस ऍक्शन मोडला, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील ७ माथाडी कामगारांवर गुन्हे दाखल...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : सध्या महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस ऍक्शन मोडमध्ये आल्याचे पहावयास मिळत आहे. मागील काही दिवसापूर्वी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या व काही चाकण औद्योगिक वसाहती मधील कंपन्याच्या माध्यमातून पोलीस अधिकारी व सर्व कंपन्याचे प्रतिनिधी अशी संयुक्त बैठक घेण्यात आली होती. त्यात बहुतेक सर्वच कंपन्यानी आम्हाला स्थानिक गुंडाच्या पासून संरक्षण द्या असा सूर लावून धरला होता. त्याच अनुषंगाने सर्व बाजूनी पडताळणी करून जे कंपन्याना जाणून बुजून त्रास देत असतील त्यांच्यावर गुन्हे नोंद करून कडक कारवाई करण्यास महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी सुरुवात केली आहे.
मागील चार दिवसापूर्वी कंपनी प्रशासनाला धमकवल्या प्रकरणी वराळे येथील एका व्यक्तीवर महाळुंगे एमआयडीडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. त्या कारवाई नंतर ३१ जानेवारी २०२३ रोजी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या निघोजे येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील ७ माथाडी कामगार यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कंपनीतील आणि माथाडी टोळीतील मुकादमने व काही साथीदारसह माथाडी म्हणून काम करत असलेल्या कामगारांचीच आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कंपनीत ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून जो माल येतो तो उतरवण्यासाठी मोबदला म्हणून वाहनाच्या प्रकारावर ठरलेल्या रक्कम रोख स्वरूपात किंवा चेक स्वरूपात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या गेट नंबर १० व ३ येथील कंपनीत काम करत असलेल्याच माथाडी कामगारांच्या पैकी पावत्या फाडण्या करिता नेमलेल्या माथाडी मजुरांकडे पावत्या जमा करतात.
नेमणूक केलेला मुकादम पावत्याच्या माध्यमातून जमा झालेले पैसे माथाडी बोर्डाकडे जमा करत असतो. महिन्याचे एकत्रित जमा झालेल्या रकमेतून माथाडी कामगारांचा महिन्याचा पगार म्हणून बोर्डाकडून वाटला जातो. पण माथाडी कामगारांच्या म्हणण्यानुसार आम्ही महिन्यात किती गाड्या माल उतरवतो याची आम्हालाही माहिती असते. त्यामुळे आमचा बोर्डाकडून महिन्याला किती पगार होईल याचा कामगारांना अंदाज असतो. त्यानुसार आमचे पगार आम्ही काम करतो त्यापेक्षा कमी होत असल्याचे निदर्शनास आले त्यावरून जे पावत्या जमा करण्यासाठी ठेवलेले मुकादम व त्यांचे सहकारी पावत्याच्या माध्यमातून रोख व चेक स्वरूपात येणारी रक्कम बोर्डाला भरत नाहीत. तसेच वाहन चालक / मालक यांच्याकडुन पावती प्रमाणे पैसे घेऊन बोर्डाला कमी पैसे भेटली असे कळवतात. त्यामुळे बोर्डाला जमा होत असलेली रक्कम कमी होते व आमचा महिन्याचा पगारही तब्बल १५ ते २० हजाराने कमी होत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. यावरून माथाडी कामगार यांची मोठी आर्थिक फसवणूक होत असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
याच तक्रारीच्या अनुषंगाने महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमधील टोळी क्रमांक ६७७ मधील माथाडी मुकादम नामदेव मधुकर कंद व सहकारी माथाडी कामगार नितीन दौंडकर, नवनाथ थिटे, अतुल गारगोटे, राहुल आंद्रे, शरद कंद व संदीप मधुरे यांच्यावर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी हे करीत आहेत.