बोपेगाव ग्रामपंचायतच्या'वतीने, कृषी अभ्यास दौऱ्याचे आयोजन...

बोपेगाव ग्रामपंचायतच्या'वतीने, कृषी अभ्यास दौऱ्याचे आयोजन...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील बोपेगाव येथील ग्रामपंचायत व जैन ठिबक सिंचन कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी मोफत कृषी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या दौऱ्यात शेतकऱ्यांनी जळगाव येथील जैन हिल्स या अभिनव कृषी मोहत्सवास भेट दिली. बोपेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच वसंतराव कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या दौऱ्यात कमीत कमी पाण्यात उत्तम प्रकारे शेती कशी करू शकते याचे प्रात्यक्षिक बघायला मिळाले असून जैन इरिगेशनच्या माध्यमातून बदलत्या हवामानाशी दोन हात करण्याची क्षमता असलेल्या अनेक पिकांच्या नवनवीन जाती विकसित करण्यात आल्याचे बघायला मिळाले ही बाब शेतकऱ्यांचा उत्साह वाढवणारी असल्याचे मत सरपंच वसंतराव कावळे यांनी व्यक्त केले.

यावेळी गावातील तरुण प्रगतिशील शेतकऱ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला या वेळी 105 शेतकऱ्यांसाठी 2 बसेस ची व्यवस्था ग्रामपंचायतच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली होती. यावेळी जैन इरिगेशन सिस्टीम कंपनीच्या वतीने जळगाव येथे डोंगराळ जमिनीवर साकारण्यात आलेल्या जैन हिल्सला भेट देण्यात आली. या ठिकाणी कंपनीच्यावतीने ठिबक सिंचन पद्धतीच्या माध्यमातून  लागवड करण्यात आलेल्या विविध पिकांची पाहणी करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बदलत्या काळात आधुनिकतेची कास धरली पाहिजे या दृष्टीने कंपनीच्या विविध मान्यवर शेती तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. ग्रामपंचायतच्यावतीने गावातील शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारे मोफत अभ्यास दौरा आयोजित केल्यामुळे सहभागी शेतकऱ्यांनी यावेळी आनंद व्यक्त करून ग्रामपंचायतचे आभार मानले.

यावेळी दौऱ्यात कंपनीचे प्रतिनिधी मुकुंद देशमुख,सलीम मुलाणी,ग्रामविकास अधिकारी भोजने,उपसरपंच योगेश कावळे, शेतकरी संपतराव कावळे,केशवराव कावळे,सूर्यकांत पगार,चंद्रकांत भवर, संदीप कावळे,आदित्य कावळे, शिवाजी पगार आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.