दिंडोरी पोलीस निरीक्षकपदी पंढरीनाथ ढोकणे यांची नियुक्ती.! तर आव्हान अनेक...

दिंडोरी पोलीस निरीक्षकपदी पंढरीनाथ ढोकणे यांची नियुक्ती.! तर आव्हान अनेक...

NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण

नाशिक : दिंडोरी पोलिस ठाण्याची जिल्ह्यातील शांत पोलिस ठाणे म्हणून असलेली ओळख गेल्या काही वर्षांत बदलून येथे गुन्हेगारी व अवैध धंद्यांच्या यादीत दिंडोरीचे नाव गणले जात आहे. नव्याने रुजु झालेले पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्यासमोर गुन्हेगारी व अवैध धंदे रोखत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून दिंडोरी पोलिस ठाण्यास गतवैभव परत मिळवून देण्याचे आव्हान उभे असून त्यात त्यांना यश मिळेल का? याची उत्सुकता दिंडोरीकरांना लागली आहे.

दिंडोरी शहर व दिंडोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तसे गुन्ह्याची संख्या गेल्या काही वर्षांपुर्वी अत्यल्प होती. मात्र गेल्या काही दिवसात चोरट्यांनी  पोलिसांनाच आव्हान देत चोर्‍यांचा सपाटा लावला आहेत.दिंडोरी शहर व ग्रामीण भागातील गावांमध्ये दुकाने व घरफोडीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच वाहने चोरीच्या घटना घडल्या आहेत.मात्र यातील बोटावर मोजण्याइतपत गुन्ह्याची उकल झाली मात्र अनेक गुन्हे तपासात पोलिसांना अपयश आल्याने चोरांचे मनोबल वाढत आहे. त्यासोबतच तालुक्यातील गावागावात व औद्योगिक वसाहातील अवैध दारु विक्री तसेच व्हाटसअ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने मटका, सोरट, गांजा, बंट्या, गुटखा विक्री आदी अवैध धंदे बंद करण्याची मागणी वारंवार नागरिक करत असतांना; केवळ धातुरमातूर कार्यवाही केली जात आहे. पोलिस ठाण्यामधील काही बोटावर मोजण्याइतक्या बहाद्दरांच्या अवैध धंद्यावाल्यांशी असलेल्या अर्थपुर्ण संबंधामुळे अवैध धंदे जोरात सुरु असल्याचे चर्चा आहे. यामुळे प्रामाणिक कर्मचारीही बदनाम होतात हे देखील तितकेच सत्य आहे. त्यामुळे अशा कलंकित कर्मचार्‍यांचा शोध घेत त्यांना लगाम घालण्याचे आव्हाहन पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्यासमोर आहे. दिंडोरी पोलिस ठाण्यात अधिकारी जास्त आणि कर्मचारी कमी अशी अवस्था असून पोलिस प्रशासनामधील गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे निदर्शनास आले आहे. अवैध धंद्यांबाबत काही ठिकाणी तक्रारदारांवरच प्रश्‍नांची सरबत्ती करत काही पोलिस अधिकार्‍यांनी त्यांना नाउमेद केल्याच्या घटना घडल्याने तक्रारदारही तक्रार करावी की नाही या विवंचेनेत आहे. गेल्या काही दिवसातच सोशल माध्यमातील पोस्टवरुनही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत असतांना पोलिस प्रशासनाने डोळेझाक केल्याने काही विपरीत घटनाही घडल्या आहेत. शाळा, महाविद्यालय, बसस्थानक आदी ठिकाणी रोेडरोमिओंचा उपद्रव वाढलेला आहे. आठवडे बाजारात होणार्‍या चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. दिंडोरी नगरपंचायत पदाधिकार्‍यांनी याबाबत वारंवार पोलिस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. मात्र त्यावर कोणतेही कठोर पाऊल उचलेले गेले नाही.शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍नही गंभीर आहे. याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. दरम्यान नुकतेच अनुभवी व प्रशासनावर वचक असल्याची चर्चा असणारे पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांची दिंडोरी पोलिस ठाण्यात नव्यानेच नियुक्ती झाली असून त्यांच्याकडून दिंडोरीवासियांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखुन गुन्हेगारी प्रवृत्तीचा बिमोड करुन लोकाभिमुख काम करण्याचे आव्हान त्यांच्या पुढे आहे. तरी या आव्हानाला ते कितपत पेलवतात याकडे अवघ्या दिंडोरीकरांचे लक्ष लागले आहे. 

1) चोरांचा बंदोबस्त होणार केव्हा?

दिंडोरी शहरात दिवसाढवळ्या चोर्‍या झाल्या आहेत. भरवस्तीत चोरी करणार्‍या चोरांचा सुगावा लागत नसल्याने शासंकता निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातही शेती उपयोगी पिस्टन पंप, केबल व इतर शेती उपयोगी वस्तू, शेतमाल यांचीही चोरी होत आहे. औद्योगिक वसाहत देखील चोरांचे प्रमाण वाढले आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालेले असतांनाही चोरांचा सुगावा लागत नाही. तालुक्यातील जानोरीमध्ये रहिवाशी असलेल्या एका चोरट्याला नांदगाव पोलिस ठाण्यात अटक झाली. न्यायालयात नेत असतांना पोलिसांनाच चकवा देत आरोपी फरार झाला. तत्पुर्वी जानोरीत झालेल्या चोरीच्या गुन्ह्यात संबंधित चोराचा समावेश होवू शकतो, अशी शंका उपस्थित केली गेली होती परंतू आवश्यक ती कार्यवाही झाली नाही.

2) मटका, सोरट, अवैध दारु विक्री सुरुच

नाशिक ग्रामीणचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांनी अवैध धंद्यांवर कार्यवाहीचा बडगा कायम ठेवला आहे. परंतू दिंडोरी तालुक्यातील अवैध धंद्यांना पुर्णपणे आजही लगाम लागलेला नाही, असेच काहीसे चित्र दिसत आहे. आजही दिंडोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत व्हाटसअ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने मटका जोरात चालू आहे. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रासह इतर भागातही छुप्या पध्दतीने दारु विक्री केली जाते. त्याचबरोबर गांजा, बंट्या यासारख्या अंमली पदार्थांची विक्री होत आहे. याचे सेवन अल्पवयीन व शाळकरी मुले करत असल्याने मोठा चिंतेचा विषय ठरत आहे. संबंधिताचे नावे पोलिसांना कळवूनही ठराविक साठा हस्तगत झाल्याशिवाय विक्रीत्यांवर कार्यवाही होत नसल्याचे उत्तरे मिळतात. त्याचबरोबर सोरट, जुगारी सारखे डाव रंगले जातात. यातून भांडणाचे प्रमाण वाढले आहे. तक्रारी करुनही याचा बंदोबस्त होत नाही, हे विशेष.