दिंडोरीत ग्रामीण साहित्य संमेलन.! संमेलनाध्यक्षपदी विजयकुमार मिठे

दिंडोरीत ग्रामीण साहित्य संमेलन.! संमेलनाध्यक्षपदी विजयकुमार मिठे

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी सांस्कृतिक मंच आयोजित दिंडोरी येथे होणाऱ्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे यांची निवड झाल्याचे स्वागताध्यक्ष तुषार वाघ यांनी जाहीर केले आहे.ते दिंडोरी येथे मित्र मंडळ वाचनालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.विजयकुमार मिठे हे गेल्या पन्नास वर्षांपासून साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत.

त्यांनी कथा, कविता,कादंबरी, ललित,एकांकिका, आकाशवाणी श्रुतीका अशा विविध वाड्मय प्रकारात लेखन केलेले आहे. घोंगट्याकोर,कादवेचा राणा बुजगावणं,गावाकडची माणसं,माझी माणसं,लाऊक,येसन,हिरवी बोली,ओल तुटता तुटेना, हेळसांड,गाव कवेत घेताना, गावाकडचे आयडॉल,झाडांची झुलती माया,आम्ही साक्षर श्रीमंत,लेखणी उडाली आकाशी,मातीमळण, चांदणभूल,आभाळओल,कोंबडखुळ,आई जन्मभराची शिदोरी,अशी ग्रंथ संपदा प्रकाशित केली असून त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. त्यांच्या"चांदणभूल" या ललित लेखाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए, बी.कॉम,बी.एससी प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.दिंडोरी येथील आदिवासी सांस्कृतिक भवनात रविवार दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या एक दिवसीय साहित्य संमेलनास महाराष्ट्रातील अनेक नामवंत साहित्यिक,कवी, व्याख्याते उपस्थित राहणार आहेत.या संमेलनासाठी साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन दिंडोरी तालुका सांस्कृतिक मंचच्या वतीने करण्यात आले आहे.