मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आज होणार राज्यस्तरीय शुभारंभ...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी (दि. 17) बालेवाडी (पुणे) येथून होणार आहे. यानिमित्त लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातही 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जावेद शेख यांनी दिली.
राज्यस्तरीय समारंभामध्ये लातूर जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना सहभागी होता यावे, यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे बालेवाडी येथील समारंभाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृह येथून लातूर जिल्ह्यातील लाभार्थी महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थी महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्याची कार्यवाही करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचाही यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार असल्याचे जावेद शेख यांनी सांगितले.