तहसील कार्यालयातून EVM मशीन चोरी.! तर आयोगाकडून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलंबित...

तहसील कार्यालयातून EVM मशीन चोरी.! तर आयोगाकडून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलंबित...

NEWS15 मराठी रिपोर्ट - पुणे ग्रामीण

 पुणे जिल्ह्यातील सासवड तहसील कार्यालयातून चक्क ईव्हीएम (EVM) मशीन चोरी झाल्याची घटना सोमवार दि. 05 रोजी उघडकीस आली होती. शनिवार आणि रविवारी अशी दोन दिवस तहसील कार्यालयाला सुट्टी असल्याने, सदर प्रकरण घडले असल्याचे सांगण्यात आले होते. तर तिसऱ्या दिवशी कर्मचारी / अधिकारी कार्यालयात दाखल झाल्यावर त्यांना EVM चोरी झाल्याचे समजले.

आता त्या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली असून, तालुका पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट निलंबित करण्याचे आदेश काढले आहे.

निवडणूक आयोगाने याप्रकरणी येथील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

यात पुढे म्हंटले आहे की, ''आयोगाने परिच्छेद 6 (अ) मध्ये समाविष्ट असलेल्या प्रशिक्षण आणि जागरूकता स्ट्राँग रूमच्या सुरक्षा प्रोटोकॉलची खात्री न केल्याबद्दल जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे आणि पोलिस अधीक्षक (ग्रामीण), पुणे यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्याचे निर्देश दिले आहेत.''

सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनची चोरी झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत; पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 24 तासात 2 चोरट्यांना या प्रकरणी अटक केली. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना कंट्रोल युनिटसह जेजुरीमधून अटक केली आहे. नेमकी त्यांनी ही चोरी कशासाठी केली याचा तपास सुरू आहे. आता सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार आणि रविवारी अशी दोन दिवस तहसील कार्यालयास सुट्टी होती. सोमवारी सकाळी आकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्राँग रूमचं कुलूप तोडण्यात आलेल आढळून आले. या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीन मधून एक ईव्हीएम मशीन चोरीला गेल्याचं समजताच एकच खळबळ उडाली होती.

देशात आणि राज्यात याआधी'ही EVM च्या कार्यप्रणाली आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात असून, देशात अनेक निवडणूकादरम्यान EVM मशीन बेवारस आणि खाजगी ठिकाणी सापडल्या आहेत. त्यात आता ही चोरीची घटना आणि थेट शासकीय कार्यालयातून घडली आहे.