“त्यांची हिंमत आम्हाला हलवून गेली”: ‘अक्षरधाम: ऑपरेशन वज्र शक्ती’च्या भावनिक प्रवासाबद्दल दिग्दर्शक केन घोष यांची भावना

“त्यांची हिंमत आम्हाला हलवून गेली”: ‘अक्षरधाम: ऑपरेशन वज्र शक्ती’च्या भावनिक प्रवासाबद्दल दिग्दर्शक केन घोष यांची भावना

झी स्टुडिओज आणि कॉन्टिलो पिक्चर्स प्रस्तुत ‘अक्षरधाम: ऑपरेशन वज्र शक्ती’ या चित्रपटाचा ट्रेलर सध्या चर्चेत आहे. 2002 साली गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यावर आणि त्यानंतर झालेल्या धाडसी एनएसजी ऑपरेशनवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या काळजाला भिडतो आहे. चित्रपट येत्या 4 जुलै 2025 रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटात अक्षय खन्ना प्रमुख भूमिकेत असून, गौतम रोडे आणि विवेक दहिया यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन केन घोष यांनी केले असून, निर्मिती अभिमन्यु सिंग यांची आहे. ट्रेलरला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, त्यातील वास्तववादी अ‍ॅक्शन, देशभक्तिपूर्ण भावना आणि शौर्याचे प्रामाणिक चित्रण यामुळे तो लोकप्रिय ठरत आहे.

दिग्दर्शक केन घोष यांनी चित्रपटाच्या निर्मितीदरम्यानचे भावनिक क्षण शेअर करताना सांगितले, “कमांडोंचे धैर्य, त्यांची निःस्वार्थ वृत्ती — जेव्हा त्यांचे प्राण धोक्यात होते, तरी ते देशासाठी प्राण द्यायला तयार होते — हे सगळं अनुभवणं खूपच भावनिक होतं. त्यांची हिंमत आम्हाला हलवून गेली.”

चित्रपटाचा पहिला शॉट आणि एक अविस्मरणीय अनुभव शेअर करत घोष म्हणाले, “शेवटचा सीन — पूलावरचा सीन — हा खरंतर आमचा पहिला शॉट होता. आम्ही मनालीला पोहोचलो आणि तिथे बर्फवृष्टी सुरू झाली होती. हा सीन अक्षरशः बर्फात शूट करावा लागला आणि तो आमच्या शूटींगमधील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक ठरला.”

‘अक्षरधाम: ऑपरेशन वज्र शक्ती’ हा केवळ अ‍ॅक्शन थ्रिलर नसून, त्याचे खरं हृदय हे त्यातील भावना, त्याग, कुटुंब आणि शौर्य यामध्ये आहे. जसजशी रिलीज डेट जवळ येते आहे, तसतसा हा चित्रपट भारताच्या गुप्त आणि शूर नायकांना वाहिलेली एक सच्ची श्रद्धांजली म्हणून प्रेक्षकांसमोर उभा राहत आहे.